पत्रकारांच्या आरोग्यासाठी डिजिटल मीडिया संपादक संघटना व ट्युलिप हॉस्पिटल सरसावले – पंढरपुरात आरोग्य शिबिर संपन्न
६० पत्रकार व कुटुंबीयांची मोफत तपासणी, ३० जणांची आयुष्मान भारत कार्डसाठी नोंदणी
पंढरपूर प्रतिनिधी,

पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना वेळेचे बंधन नसल्याने पत्रकारांचे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच गरज ओळखून अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ आणि ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजकुमार शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत निकम, प्रदेशाध्यक्ष सतिश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीचा वारसा
कार्यक्रमाचे उद्घाटन आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले की, “आमची संघटना नेहमीच पत्रकारांच्या आरोग्यासाठी अग्रभागी राहिली आहे. डॉ. प्रशांत निकम यांच्यासारखे सामाजिक जाणीव असणारे लोक सोबत असल्याने हे शक्य होत आहे.”

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी ट्युलिप हॉस्पिटल आणि संघटनेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी डॉ. प्रशांत निकम यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल संघटनेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शिबिराचा लाभ आणि आरोग्य जनजागृती
पंढरपूर शहर व परिसरातील सुमारे ६० पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिरात सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचारही देण्यात आले. विशेष म्हणजे, सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने ३० पत्रकारांची आयुष्मान भारत कार्डसाठी जागीच नोंदणी करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात राजकुमार शहापूरकर यांनी सांगितले की, “पत्रकारांची दिनचर्या अनिश्चित असते, त्यामुळे अशा शिबिरांच्या माध्यमातून होणारी आरोग्य तपासणी ही काळाची गरज आहे.”

यांचे लाभले सहकार्य
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन रामकृष्ण भाले यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत माळवदे यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, सोहन जयस्वाल, अजित देशपांडे, दिनेश खंडेलवाल, ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. किरण झिटे, डॉ. राहुल हजनाळे, डॉ. प्राची भोसले, संतोष कोकाटे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले.

More Stories
पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा आणखी एक डंका
चंद्रभागेला पूर; आमदार समाधान आवताडे यांनी घेतला पूरजन्य परिस्थितीचा आढावा
बंदोबस्ताला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:च्या रिवाल्वरमधून गोळी झाडली