23/12/2024

म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत दाखल ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश : शेतकरी सुखावला

म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत दाखल ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश : शेतकरी सुखावला

सांगोला : तालुका प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून नावाप्रमाणे कोरडा असलेल्या कोरडा नदीत अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे. पिढ्यान् पिढ्या दुष्काळात होरपळत असणाऱ्या कोरडा नदीचे भाग्य उजळले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अनेक वर्षानंतर कोरडा नदीत पाणी दाखल झाल्याने नदी काठी असणारा शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

सांगोला तालुक्यातील सोनंद गळवेवाडी जवळा आलेगाव मेडशिंगी वाढेगावसह सांगोला तालुक्यातील अनेक गावांना या कोरडा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ होणार आहे. गेली १५ वर्षापूर्वी कार्यतपस्वी स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निम्मित तत्कालीन आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रथमच कोरडा नदीला म्हैसाळ योजनेतून पाणी येऊ शकते हे दाखवून दिले होते. तेंव्हापासून आजतागायत जेंव्हा कोरडा नदीकाठी असणारा शेतकरी अडचणीत आला तेंव्हा प्रत्येक वेळी बळीराजाच्या मदतीला माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील धाऊन आले आहेत. सध्या राज्यात सर्वच नद्यांना समाधानकारक पाणी असताना नेहमी प्रमाणे कोरडा असणारी सांगोला तालुक्यातील कोरडा नदी ठणठणीत पडली होती. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीला पाणी सोडण्याची मागणी केली होती. आबांच्या मागणीनुसार अखेर कोरडा नदीत म्हैसाळचे पाणी दाखल झाल्याने कोरडा नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.