23/12/2024

लोणारी समाजाच्या हक्कासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

लोणारी समाजाच्या हक्कासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

आबा-बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाजाला मिळाला न्याय

सांगोला तालुका प्रतिनिधी

भारतीय समाज व्यवस्थेत अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू समाज म्हणून ज्यांची ओळख आहेत अशा लोणारी समाज बांधवांच्या हक्कासाठी माझ्या स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरीही मी मागे हटणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. सांगोला तहसील कार्यालय समोर लोणारी समाज बांधवांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू होते. आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शिष्टाईने लोणारी समाजाचे आंदोलन स्थगित करण्यात आले असून लोणारी समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात स्मारक व्हावे, तसेच महाराष्ट्र सरकारने लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह लोणारी समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी अध्यायवत वसतीगृह निर्माण करावे व सांगोला शहरात लोणारी समाज भवनसाठी राखीव जागा मिळावी या मागणीसाठी लोणारी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष करांडे यांच्यासह डॉ. सुदर्शन घेरडे, प्रा दत्ता नरळे, श्री. खांडेकर व समाज बांधवांचे गेली तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनास गुरुवार दि १५ ऑगस्ट रोजी आमदार शहाजीबापू पाटील व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी भेट दिली व सांगोला तहसीलदार तसेच सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्याशी चर्चा करून लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकासाठी शहरातील महात्मा फुले चौकात असणारी रिकामी जागा देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच लोणारी समाज बांधवांच्या अन्य महत्त्वाच्या मागण्यावरही आजी-माजी आमदारांनी राज्य सरकारकडे सुरू असणारा पाठपुरावा व मागण्यांबाबत शासकीय कार्यवाहीची सद्यस्थिती यांची चर्चा केली.

चौकट ; समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजनलोणारी समाजाचे समाज रत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात भव्य स्मारक व्हावे अशी लोणारी समाज बांधवांची मागणी होती या मागणीबाबत आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेत सांगोला शहरातील महात्मा फुले चौकात असणाऱ्या रिकाम्या जागेवर समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला. व प्रत्यक्ष कार्यवाही करत लोणारी समाज बांधवांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन करून समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात केली.