23/12/2024

बारामती येथील जनसन्मान महा मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार ; जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील

बारामती येथील जनसन्मान महा मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार ; जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रविवार दि १४ रोजी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान महामेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बारामती येथील पक्षाच्या जनसन्मान महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि १३ रोजी पंढरपूर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी रविवार १४ रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बारामती येथील मिशन हायस्कूल मैदानावर दु १.०० वा पक्षाचा हा जनसन्मान महामेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणि शहराच्या ठिकाणाहून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत रविवार १४ रोजी होणाऱ्या पक्षाच्या जनसन्मान महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या अन्य महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवार १३ रोजी पंढरपूर येथील मार्केट यार्ड समोरील जोगेश्वरी हॉल येथे स. ११ वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पक्षाच्या माध्यमातून तालुका निहाय किती नवीन मतदार नोंदणी करण्यात आली याचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची किती नाव नोंदणी झाली याबाबत आढावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात येईल.बारामती येथे रविवार दि १४ रोजी रोजी होणाऱ्या जनसन्मान महा मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व सेलच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.