योग्य देहबोलीतून मधून संवाद कौशल्य साधणे आवश्यक -शिक्षणतज्ञ डॉ.मोहन देशपांडे
स्वेरीत ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे उदघाटन
पंढरपूर- ‘स्वेरीतील आदरयुक्त शिस्त व शिक्षण संस्कृती याबाबत मी इतर महाविद्यालयांमध्ये नेहमीच बोलत असतो. याचे कारण असे की, स्वेरीमध्ये पायाभूत शिस्त व आदरयुक्त संस्कृतीचे नेहमीच दर्शन होत असते.’ एकूणच आपल्या कार्यात एकाग्रता हवी त्यासाठी मन, डोळे व कान हे घटक महत्त्वाचे ठरतात. ‘योग्य देहबोलीतून’ ‘सुसंवाद’ साधण्याची कला अवगत करणे आवश्यक आहे. आपल्या संप्रेषणामध्ये ९३ टक्के बॉडी लँग्वेज तर सात टक्के शब्दांचा वाटा असतो. चेहरा, उभा राहणे व डोळ्यांची हालचाल याद्वारे समोरच्या व्यक्तीला बॉडीची लँग्वेज समजून येते. यासाठी आत्मविश्वासपूर्वक संवाद पाहिजे.’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ व अभियंता डॉ.मोहन देशपांडे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी व पदविका या चारही महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि.२७ जून, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ दरम्यान ‘अटेंडिंग प्रोफेशनल एक्स्पर्टीज- अ होलिस्टिक मेथड’ या विषयावर आयोजिलेल्या ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ मध्ये शिक्षणतज्ञ व अभियंता डॉ. मोहन देशपांडे मार्गदर्शन करत होते. शिक्षकेतर कर्मचारी हा महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने कणा आहे. कार्यालयीन महत्वाच्या कामात त्यांचा सिंहाचा वाट असतो. शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील शारीरिक व मानसिक क्षमता उत्तम राहावी यासाठी स्वेरीतर्फे दरवर्षी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, रजिस्ट्रार आर.जी. झरकर यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या मुख्य समन्वयिका प्रा. एम.एम.भोरे यांनी प्रास्तविकात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कार्यशाळेची गरज का आहे हे स्पष्ट केले. ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ही कार्यशाळा आठवडाभर चालणार असून याअंतर्गत सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात मार्गदर्शन कार्यक्रम होत आहेत’. पहिली बॅच २७ नोव्हेंबर, २०२३ ते २ डिसेंबर, २०२३ दरम्यान, दुसरी बॅच दि.२६ फेब्रुवारी, २०२४ ते ०२ मार्च, २०२४ दरम्यान पार पडली. यामध्ये देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. यातून उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या बॅचच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात शिक्षणतज्ञ अभियंता डॉ.मोहन देशपांडे पुढे म्हणाले की ‘मूलभूत संवाद साधत असताना आपण आपल्या विचारांचे चांगल्या रीतीने सादरीकरण केले पाहिजे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर संभाषणात लहान लहान चुका करणे टाळावे. अशा चुका टाळण्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. कोणताही मार्गदर्शनपर उपक्रम असो अथवा वरिष्ठ सांगत असतील तर त्यांच्या सांगण्याकडे, सूचनेकडे एकाग्रपणे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे असते कारण आपण सामान्य माणूस नसून एक जबाबदार नागरिक आहोत. या पद्धतीने सर्वांनी वर्तन करणे गरजेचे आहे. आपल्यात बदल घडवण्यासाठी सर्वप्रथम मनाची संपूर्ण तयारी केली पाहिजे. यासाठी आपल्या कार्यात सुधारणा करणे अपेक्षित असून त्यात परफॉर्मन्स दाखवता आला पाहिजे. आपल्या कार्यातील अडचणी सोडवण्यासाठी सुसंवाद साधताना मनाची एकाग्रता असणे आवश्यक आहे.’ दुपारच्या सत्रात व्याख्याते नानासाहेब साठे यांनी ‘पॉवर ऑफ सबकॉन्शिअस माइंड’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘माणसे आजारी का पडतात? हास्य का दुर्मिळ होत चालले आहे? मानसिकता बदलण्यासाठी काय करावे? नोकरीच्या ठिकाणी आपले वर्तन कसे असावे? इतरांशी संवाद साधताना कोणत्या गोष्टी कराव्यात या व अशा विविध महत्वाच्या विषयावर त्यांनी माहिती दिली. ‘कोणतेही काम करताना त्यात झोकून दिले पाहिजे. आपले स्किल अपडेट ठेवल्यास अधिक उत्साह जाणवत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अभियंता मोहन देशपांडे, नानासाहेब साठे व प्रा. इसाक मुजावर या तीन मार्गदर्शकांचे सर्वांना आठवडाभर मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविका मधील शिक्षकेतर कर्मचारी सह समन्वयक एस.सी.हलकुडे यांच्यासह इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये क्रीडा सप्ताह संपन्न.
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत राबविला ‘नो फायर क्रेकर्स..सेफ नेचर ‘ उपक्रम.
युवा चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश.