23/12/2024

पंढरपूर नगरपरिषदेच्या मंजुर ठरावाप्रमाणे तात्काळ समाज मंदिरास जागा न दिल्यास काशीकापडी समाजाचा आमरण उपोषणाचा इशारा

पंढरपूर नगरपरिषदेच्या मंजुर ठरावाप्रमाणे तात्काळ समाज मंदिरास जागा न दिल्यास काशीकापडी समाजाचा आमरण उपोषणाचा इशारा

पंढरपूर (प्रतिनिधी):-

तुळशीमाळा बनवणार्‍या काशीकापडी समाजाची गेल्या अनेक वर्षांपासुनची समाज मंदिराची मागणी लक्षात घेता पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक 25 फेब्रुवारी 2014 मध्ये सर्वानुमते काशीकापडी समाजाला जागा देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता; परंतु अद्यापही याची अंमलबजावणी झाली नसल्याने आता काशीकापडी समाज आक्रमक झाला असुन तातडीने या ठरावानुसार काशीकापडी समाजाला समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अन्यथा पंढरपूर नगरपरिषदेत आमरण उपोषण करु असा इशारा समाजाच्या वतीने तुळशीमाळा कारागीर कामगार संघ संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी दिला आहे. याबाबतचे एक निवेदनही ठरावाच्या प्रतीसोबत जोडून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पंढरपूरचे प्रांताधिकारी यांना दिले आहे.वारकरी सांप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व असणार्‍या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळखला जाणारा समाज म्हणजे काशीकापडी समाज. पंढरपुरातील काशीकापडी गल्ली, अनिल नगर या भागासह पंढरीच्या विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या वारकर्‍यांची सेवा निस्सिम भावनेने करणार्‍या या समाजासाठी अद्याप पर्यंत पंढरीत कुठेही हक्काचे समाजमंदिर नव्हते, याची मागणी बर्‍याच वर्षांपासुन प्रलंबित होती, अखेर समाजातील अनेक मंडळींनी एकत्र येत काशीकापडी गल्लीत बंद अवस्थेत असलेल्या पंढरपुर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 4 या इमारतीवर काशीकापडी समाज मंदिर असा फलक लाऊन त्याचे उद्घाटन केले होते. पंढरपूर नगरपरिषदेत सर्वानुमते झालेल्या ठरावानुसार काशीकापडी समाजाला जागा न दिल्याने समाजाने घेतलेल्या या निर्णयानुसार हीच जागा समाजमंदिरासाठी कायदेशीररित्या मंजुर करावी अशी मागणीही समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.आज पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना काशीकापडी समाजाने निवेदन देत, ठरावाची नक्कल जोडून तातडीने हा प्रश्‍न सोडण्याची मागणी केली. अन्यथा पंढरपूर नगरपरिषदेत आमरण उपोषणही करु, असा इशारा देण्यात आला. यावेळी पंढरपूर काशीकापडी समाज अध्यक्ष औदुंबर गंगेकर, माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, तुळशीमाळा कारागीर कामगार संघ संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उपळकर समाजसेवक गणेश भिंगारे, दत्तात्रय वाडेकर, योगेश टमटम, शुभम वाडेकर आदी काशीकापडी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.