23/12/2024

कटफळ अपघातात मयत आणि जखमींच्या नातेवाईकांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील ट्रस्टच्या वतीने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत

कटफळ अपघातात मयत आणि जखमींच्या नातेवाईकांना कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील ट्रस्टच्या वतीने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत

शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे दिपकआबांचे अभिवचन

सांगोला : तालुका प्रतिनिधी

नुकत्याच चिकमहुद येथील बंडगरवाडी नजीक घडलेल्या अपघातात कटफळ ता.सांगोला येथील सहा महिला मजूर मृत्युमुखी पडल्या होत्या. या घटनेने संपूर्ण सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली होती. या घटनेत मयत झालेल्या ६ महिला मजुरांच्या कुटुंबीयांना नेहमीच जनसेवेसाठी तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. तर या अपघातात जखमी झालेल्या महिला मजुरांनाही उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

कटफळ ता. सांगोला येथील मृतांच्या नातेवाईकांना ही आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी वसंत जरे, विजयदादा येलपले, बाळदादा सराटे,कृष्णदेव सावंत, शहाजी करचे, कैलास खबाले ,दिलीप नागणे, विठ्ठलनाना बागल, देवदत्त भोसले, गोवर्धन गोडसे, दादासाहेब घाडगे,महादेव कांबळे, नितीन रणदिवे ,रवींद्र कांबळे ,बापूसाहेब चव्हाण, प्रकाश खरात, शहाजी खरात, सोमनाथ खरात, शहाजी माने, दत्तात्रय बंडगर ,सुभाष हांडे, संतोष पोतदार ,सुदर्शन पुजारी, दादासाहेब शेळके, विलास पडळकर, दीपक धांडोरे ,परमेश्वर हाके ,औदुंबर भोसले यांच्यासह मृतांच्या परिवारातील सदस्य व नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. आम. दिपकआबा म्हणाले, चिकमहुद ता.सांगोला येथे घडलेला अपघात हा फक्त अपघात नसून तो संपूर्ण सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनावर झालेला आघात होता. अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने हातावर पोट असणाऱ्या महिला मजुरी करून आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होत्या. काळाने जरी या परिवाराला एकटे सोडले असेल तरी आम्ही मृताच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. मृतांच्या परिवारातील कुणालाही कसलीही गरज असेल तर अगदी अर्ध्या रात्री त्यांनी आपल्याला हाक मारली तरी आपण त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहू. कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांनी नेहमीच संपूर्ण तालुका हाच आपला परिवार मानला होता. तालुक्यातील जनतेला अडचण आली तर ती प्रत्यक्ष आपल्या कुटुंबातील सदस्यांची अडचण आहे. असे मानून आपण नेहमीच गोर गरीब जनतेच्या सेवेत कार्यरत आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत कार्यतपस्वी आमदार स्व काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या याच विचारांवर आपण काम करणार असल्याचे यावेळी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

चौकट :

मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्य पुन्हा परत येणार नाही याची जाणीव आहे. तरीही, अशा दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांसोबत ठाम उभे राहून त्यांना या दुःखातून आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केवळ या मदतीवर थांबणार नाही तर राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून सबंधित परिवाराला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मा. आम. दिपकआबांनी स्पष्ट केले.