डॉ.परेश खंडागळे उतरणार जवळा जि.प गटातून निवडणुकीच्या मैदानात...
भाजपमधील निष्ठेच्या आणि जनसेवेच्या जोरावर निवडणूक लढवणार-डाॅ.परेश खंडागळे
सांगोला प्रतिनिधी,
सांगोला तालुक्यातील राजकारण सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापू लागले आहे. जवळा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. परेश खंडागळे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रदीर्घ जनसंपर्क, वैद्यकीय क्षेत्रातील सेवा आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा या जोरावर त्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.

डॉ. परेश खंडागळे यांनी २०१६ मध्ये जवळा पंचायत समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ चिन्हावर लढवली होती. ज्यावेळी तालुक्यात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी फारसे कोणी इच्छुक न्हवते, अशा कठीण काळात त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन ताकतीने निवडणूक लढवली.

ग्रामपंचायत असो वा पंचायत समिती, त्यांनी नेहमीच भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी भाजप उमेदवारांच्या विजयासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत.केवळ राजकारणच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातही डॉ. खंडागळे यांनी मोठे नाव कमावले आहे.

रुग्णांची सेवा करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जवळा गटातील प्रत्येक गावातील नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि लोकांमध्ये असलेली ‘हक्काचा माणूस’ ही प्रतिमा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.“अनेक वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले, सर्व वरिष्ठ नेत्यांशी समन्वय ठेवला आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवला. अनेकदा पदाची मागणी करूनही योग्य दखल घेतली गेली नाही, तरीही मी विचलित न होता पक्षाशी एकनिष्ठ राहिलो,” अशा शब्दांत डॉ. खंडागळे यांनी आपली भावना व्यक्त केली.

चौकट-केलेल्या कामाची पोच पावती सर्वसामान्य जनता नक्कीच देणार-डाॅ.परेश खंडागळे
डॉ. खंडागळे यांचे जवळा गटात मोठे नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे जाळे आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि पत्रकार बांधवांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे त्यांना या निवडणुकीत सर्वच स्तरातून मदतीची अपेक्षा आहे. या वेळी जवळा गटातील जनता आपल्या कामाची पावती नक्कीच देईल, असा विश्वास डॉ. परेश खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.

More Stories
गादेगाव येथील परिवाराचे झेडपी च्या मैदानात उतरण्याचे स्पष्ट संकेत..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या दौऱ्यावर
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत यांची निवड.