23/12/2024

छ शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

छ शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगोल्यात आज आंदोलन

सांगोला : तालुका प्रतिनिधी भारतीय नौदलाचे जनक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. राजकोट येथील किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि २९ रोजी स. १०.३० वा. सांगोला येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध देशाची अस्मिता आहेत. मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना राज्य सरकारने कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सतर्क असणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना कामात अक्षम्य त्रुटी आढळल्याने दुर्दैवी दुर्घटना घडली.

राज्य शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणी दोषी असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा पद्धतीच्या चुका होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी यासह पुन्हा मालवण राजकोट येथे भारतीय नौदलाचे जनक आणि सबंध देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांची प्रतिभा आणि दैदीप्यमान इतिहास सांगणारे स्मारक आणि छत्रपती शिवरायांचा शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी गुरू. दि २९ रोजी स. १०.३० वा. छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे या आंदोलनासाठी उपस्थित राहावे असे आवाहनही शेवटी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी केले.