शिक्षकांमुळे महाविद्यालये नावारूपास येतात -माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर
स्वेरीचा ‘२६ वा वर्धापन दिन’ उत्साहात संपन्न
पंढरपूर- ‘कोणतेही महाविद्यालय हे तेथील शिक्षकांमुळे नावलौकिकास येत असते. शिक्षकांच्या कार्य कर्तृत्वामुळे स्वेरीला एक स्वतंत्र नावलौकिक मिळालेला आहे कारण एक पुस्तक हे दहा शिक्षकांच्या बरोबर असते आणि एक चांगला शिक्षक हा लायब्ररी प्रमाणे असतो या सूत्रामुळे ‘स्वेरी’ ही आज शिक्षणक्षेत्रात एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे. स्वेरीमध्ये अभ्यासू शिक्षकांची मांदियाळी आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी या शिक्षकांच्या कार्याचा आणि कौशल्यांचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी केले.
गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या भव्य ओपन थिएटरमध्ये स्वेरीच्या २६व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वेरीचे सुरुवातीचे मार्गदर्शक, पंढरपूरचे माजी आमदार कर्मयोगी, श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र गीत आणि स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून मागील २६ वर्षांच्या परिश्रमपूर्वक वाटचालीत स्वेरी च्या ‘रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात कसे झाले’ हे सांगताना सुरुवातीच्या काळात अनेक आश्रय दात्यांनी केलेले सहकार्य, स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, विविध शैक्षणिक उपक्रम, त्या उपक्रमांना मिळालेले यश, संशोधन क्षेत्रातील प्रगती, सोलापुरातील नव्याने घेतलेले एस.व्ही.आय.टी. महाविद्यालय व त्याला अल्पावधीत मिळालेले यश आदी बाबत सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना माजी कुलगुरू डॉ. बंडगर म्हणाले की, ‘मी बऱ्याच वेळी स्वेरीत आलो त्यामुळे स्वेरीचा जवळून अभ्यास करता आला.
येथील शिस्त आणि सुसंस्कार यामुळे विद्यार्थ्यामध्ये होत असलेला बौद्धिक विकास हे भविष्यातील प्रगतीचे लक्षण आहे.’ असे सांगून मित्र आणि शिक्षक कसे असावे याचे महत्व पटवून सांगितले. अधून मधून डॉ. बंडगर यांनी खुमासदार शेर-शायरीचा वापर करून प्रगल्भ विचारांची चौफेर फटकेबाजी केली. यावेळी संस्थेचे आश्रयदाते, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, शिक्षक-पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, अनकढाळचे सरपंच बंडगर, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनिफ शेख, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही.एस.शेलार, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त अशोक भोसले, विश्वस्त एस.टी.राऊत, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त सुरज रोंगे, अभियंता अर्जुन नाडगौडा, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या अभियांत्रिकी व फार्मसीचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
चौकट –
सध्या अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरु असल्यामुळे स्वेरीच्या वर्धापन दिनाला पालक व विद्यार्थ्यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रोंगे सर म्हणाले की, ‘जेव्हा आपण अभ्यास करतो तेंव्हा जगातील प्रत्येक ब्रँच चांगली असते आणि जेव्हा आपण अभ्यास करत नाही तेव्हा मात्र जगातील कोणतीही ब्रँच चांगली नसते. एकूणच अभ्यास आणि परिश्रम या गोष्टी विद्यार्थ्याला कराव्याच लागतात.’
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम