23/12/2024

महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरात होतंय याचा आनंद-किरण (आप्पा) भोसले

पंढरपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरात होतंय याचा आनंद-किरण (आप्पा) भोसले.

राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाचा वनवा पेटला असताना पंढरपूरमध्येही सकल मराठा समाज आक्रमक झाला होता. कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊ न देण्याच्या निर्णय सकल मराठा समाजाने घेतला होता. तेव्हा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पंढरपूरमध्ये सकल मराठा समाज भवन उभारले जावे ही प्रमुख मागणी होती.सदर मागणी मान्य झाल्यानंतर पंढरपूर शहरांमधील महत्त्वाच्या चार ते पाच जागांची पाहणी सकल मराठा समाज व तेव्हाचे प्रांत गजानन गुरव यांनी केली होती.

त्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला अहवाल सादर केला. याबाबत पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आ. समाधान आवताडे यांनीही विधानसभेमध्ये आवाज उठवून शासन दरबारी प्रश्न उपस्थित करत मराठा भवनाला पाच कोटीच्या निधीची मागणी केली होती. त्या सर्व प्रश्नाला यश आले असून राज्यातील पहिले सकल मराठा भवन पंढरपूर मध्ये साकारणार आहे. या भावनाचा पायाभरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी होत आहे. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील,आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणिती ताई शिदे, आ. समाधान आवताडे,माजी नगराध्यक्ष साधना ताई भोसले,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांत सचिन इथापे,मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण भोसले यांनी दिली आहे.

या भावना करता तब्बल पाच कोटी पाच लाख निधी मंजूर करण्यात आला असून राजश्री छत्रपती शाहू महाराज मराठा भवन या नावाने हे भवन आता पंढरपूरमध्ये उभे राहणार आहे. राज्यातील हे सर्वात पहिले मराठा भवन असल्याचे पहावयास मिळणार आहे. या भावना करता सकल मराठा समाजाच्या सर्वच बांधवांनी जोरदार पाठपुरावा केला असल्यामुळे दक्षिण काशी पंढरी नगरीमध्ये सकल मराठा समाजाच्या प्रयत्नांना सर्वात मोठे यश आल्याचेही पहावयास मिळत आहे.