उत्तम मानसिकतेसाठी नकारात्मकतेपासून मुक्ती आवश्यक- आरोग्य सल्लागार नानासाहेब साठे
स्वेरीत ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ चा समारोप
पंढरपूर- ‘आपण दैनंदिन कार्य करत असताना आपल्या मनात लाखो विचार डोकावत असतात. ते विचार चांगलेच असतील असे नाही परंतु आलेल्या नकारात्मक विचाराने आपण मात्र गोंधळून जातो. त्यामुळे साहजिकच आपण आपली मानसिकता हरवतो. यासाठी मनामध्ये ज्या ज्या वेळी नकारात्मक विचार येत असतात त्यावेळी त्यांना काढून टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली मानसिकता उत्तम राहते आणि कामातील उत्साह वाढून आपण यशाकडे जलद गतीने झेप घेवू शकतो.’ असे प्रतिपादन आरोग्य सल्लागार व मार्गदर्शक नानासाहेब साठे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी व पदविका या चारही महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि.२७ जून, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ दरम्यान ‘अटेंडिंग प्रोफेशनल एक्स्पर्टीज- अ होलिस्टिक मेथड’ या विषयावर ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या समारोप प्रसंगी शिक्षणतज्ञ, आरोग्य सल्लागार व मार्गदर्शक नानासाहेब साठे हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीतर्फे दरवर्षी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ च्या मुख्य समन्वयिका प्रा. एम.एम.भोरे, सह-समन्वयक रजिस्ट्रार आर.जी. झरकर व एस.सी. हलकुडे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली. ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ही कार्यशाळा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात आठवडाभर चालली. पहिली बॅच २७ नोव्हेंबर, २०२३ ते २ डिसेंबर, २०२३ दरम्यान, दुसरी बॅच दि.२६ फेब्रुवारी, २०२४ ते ०२ मार्च, २०२४ दरम्यान तर शेवटची म्हणजे उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि.२७ जून, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ या कालावधीत पार पडली. तिसऱ्या बॅचमध्ये शिक्षणतज्ञ अभियंता डॉ.मोहन देशपांडे, समुपदेशक प्रा.इसाक मुजावर व शिक्षणतज्ञ नानासाहेब साठे यांनी सहाही दिवस प्रेरणादायी, उत्साहवर्धक व मौलिक विचार मांडून परिस्थिती कशी हाताळायची याबाबत महत्वाच्या टिप्स दिल्या. त्यामध्ये नेतृत्वगुण अंगी येण्यासाठी काय करावे? संवाद कौशल्य साधताना बॉडी लँग्वेज कशी असावी? वरीष्ठांशी संवाद कसा साधावा ? ताण तणावापासून दूर कसे राहायचे ? सकारात्मक कार्य करण्यासाठी कोणकोणत्या बाबींकडे अधिक लक्ष केंद्रित करावे ? चुका टाळण्यासाठी काय करावे ? महत्वाचे काम कमी वेळेत आणि स्मार्ट पद्धतीने कसे करावे? अंगीकृत कार्य आणि दिलेली जबाबदारी पार पाडताना मानसिकतेत बदल न करता कोणती कौशल्ये वापरून योग्य कार्य साधता येईल? हे सर्व करताना नातलग, आपले आरोग्य सुस्थितीत कसे राहील? अडचणी सोडवताना मनाची एकाग्रता कशी असावी ? या विषयांवर तिन्ही वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविका मधील जवळपास ५५ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम