23/12/2024

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना


भाविकांनी 1800-233-1240 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
– अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर

            पंढरपूर दि.09:  आषाढी यात्रा कालावधीत  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती  तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे.  यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून, भाविकांना अडचण आल्यास 18000-233-1240 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 02186-220240 व 299243 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी  तथा इन्सिंडट कमांडर मोनिका सिंग ठाकूर  यांनी केले आहे.
  आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने  कोणतेही गैरसोय होऊ नये  यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका, तहसिल कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. तसेच मुख्य आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र प्रांत कार्यालय पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.
 आरोग्य विभागामार्फत यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा   उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून  दर्शन रांग, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर व मंदीर परिसर येथे वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. 
           65 एकर परिसरात मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था, अखंडीत व सुरक्षित विद्युत पुरवठा, अग्निशमन व्यवस्थेसह फिरते आरोग्य पथकांची  नेमणूक करण्यात आली आहे.नदीपात्रात स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहिल याची दक्षता घेण्यात आली आहे. डास प्रतिबंधासाठी औषधाची  फवारणी,  शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहतुकीस कोणतेही अडचण येवू नये यासाठी शहराबाहेर मोकळया जागेवर वाहन  पार्किग व्यवस्था करण्यात आली असल्याचे  अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी सांगितले. 

00000000