17/02/2026

वडापूरात श्री प्रभुलिंग देव मंदिर यात्रेला उद्यापासून दिमाखदार सुरुवात… १३ पालख्यांचा अमृतमय संगम

वडापूरात श्री प्रभुलिंग देव मंदिर यात्रेला उद्यापासून दिमाखदार सुरुवात… १३ पालख्यांचा अमृतमय संगम ;

कुस्त्या आणि दारूकामाची रंगत…

सोलापूर प्रतिनिधी

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६ 0समीर शेख प्रतिनिधीसोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील श्री प्रभुलिंग देवाच्या वार्षिक यात्रेला सोमवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. मानाचे नंदीध्वज, काठ्या तसेच मिरी-वडापूर येथील श्री प्रभुलिंग देवाच्या पालखी मिरवणुकीने यात्रेचा शुभारंभ होणार असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. सोमवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी ४ वाजता १३ पालख्यांचा अमृतमय भेटी सोहळा पार पडणार आहे.

यात होनमुर्गी, सोरेगाव, इंदापूर (पुणे), बोराळे, सिद्धापूर, मंद्रूप, कुंभारी, मद्रे, तेवरट्टी (कर्नाटक), मिरी आणि वडापूर येथील देवस्थानांच्या पालख्या सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्याकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे.रात्री ९ वाजता मिरजगी येथील अमोगसिद्ध गायन संघ व हळळूर येथील महाळींगराया गायन संघ यांच्यात कन्नड ढोलावर आधारित गायनाचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी ग्रामस्थांचे नैवेद्य होईल. दुपारी २ वाजता पैलवानांच्या जोड्या जाहीर करण्यात येतील, तर सायंकाळी ४ वाजता मल्लांच्या भव्य कुस्त्या रंगणार आहेत. रात्री ७ वाजता नयनरम्य शोभेचे दारूकाम आणि ८ वाजता बालाजी शिरसाट यांचे सोंगी भारुड होणार आहे. बुधवारी (१८ फेब्रुवारी) दिवसभर लेकीचा नैवेद्य होणार असून दुपारनंतर पालख्यांचा कर तोडण्याचा विधी पार पडेल. सायंकाळी ७ वाजता ‘लावण्यखणी’ या मनोरंजन कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल.

यात्रेची वैशिष्ट्ये —

यात्रेदरम्यान तीन दिवस अखंड महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मजली भव्य महाप्रसाद कक्ष, प्रशस्त पालखीतळ, निसर्गरम्य मंदिर परिसर, भव्य व देखणी शंकराची मूर्ती आणि रेखीव शिल्पकला हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरत आहे. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री परमानंद देव ट्रस्ट, श्री प्रभुलिंग यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.