रस्त्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री; अन्न व भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष
मावा गुटख्यासह बनावट खाद्यपदार्थांचा आषाढी वारीत विक्रेत्यांनी मांडला बाजार
पंढरपूर प्रतिनिधी,
आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो भाविक भक्त पंढरपुरात दाखल होत आहेत. आषाढी एकादशी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून उंटावरून शेळ्या राखल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे .

कारण रस्त्यावर खुलेआम मिळेल त्या जागेवर पेढे व इतर खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे.पंढरपूर शहरात प्रदक्षिणा मार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर छोटे मोठे व्यापारी आणि परप्रांतीय फेरीवाले उघड्यावर पेढे, मिठाई विक्री करताना दिसत आहे.मात्र या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने भाविकांना अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे वारकरी भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

यात्रा कालावधी अगोदर संबंधित विभाग मार्फत मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या होत्या मात्र सदर विभागाकडून यात्रा काळात कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दरवर्षीच पहावयास मिळत असते. यामुळेच परप्रांतीय खाद्य विक्रेते यात्रा काळात मिळेल त्या ठिकाणी, मिळेल ती जागा पकडून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करत असतात याचा फटका मात्र सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मैलोन मैल पायपीट करून आलेल्या पंढरी नगरीतील भाविकांना बसत असतो.अन्न व औषध विभाग नेमका कधी जागे होणार हे मात्र कळेनासे झाले आहे.

कारण सदैव पंढरी नगरीमध्ये या विभागाकडून उंटावरूनच शेळ्या राखल्या जात असतात, काम केल्याचा देखावा केवळ कागदपत्रे रंगवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची धुळपेख या विभागाकडून केली जात आहे यामुळे यात्रा काळात भाविकांचे आरोग्य हे पांडुरंगाच्या भरवशावरच अवलंबून राहत असते.परप्रांतीय विक्रेत्यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना फटकायात्रा काळात पंढरी नगरीमध्ये परप्रांतीय खाद्य विक्रेत्यांची मोठी घुसखोरी होत असते त्यांना ठोस आवर घातला जात नसल्यामुळेच दरवर्षी यांची संख्या वाढत जात आहे, ही बाब वारकरी भावीक भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे परंतु तरीही संबंधित विभाग झोपेचे सोंग घेत आहे.
More Stories
5 वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
नगरपरिषद पंढरपूर आषाढी यात्रा 2025 यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन-मुख्याधिकारी महेश रोकडे