06/09/2025

महिला वर्गाच्या उपस्थितीला दाद द्यावी लागेल – सौ सीमाताई परिचारक

महिला वर्गाच्या उपस्थितीला दाद द्यावी लागेल – सौ सीमाताई परिचारक

अनिलनगर येथील हळदी कुंकू समारंभात हजारो महिलांची गर्दी

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा उडू लागला आहे. निवडणूक जाहीर होण्याअगोदरच , प्रभागातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाऊ लागले आहेत. गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी , परिचारक गटाचे खंदे समर्थक लाला पानकर आणि भाऊ टमटम परिवाराने महिला वर्गासाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. या समारंभासाठी शहरातील हजारो महिलांनी गर्दी केली होती.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या सौ. सीमाताई प्रशांत परिचारक, सौ. अमृताताई प्रणव परिचारक , दुर्गाताई माने यांच्यासह पानकर आणि टमटम कुटुंबीय उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले , आणि सदरच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी बोलताना सौ. सीमाताई परिचारक यांनी या कार्यक्रमाचे आयोजक लाला पानकर आणि भाऊ टमटम परिवारांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी जमलेल्या हजारो महिलांचे आभार मानले.

दैनंदिन कामे वेळेत उरकून सायंकाळी सात वाजता , कार्यक्रमासाठी आवर्जून हजर राहणाऱ्या महिलांनी , मोठी कसरत करून उपस्थिती दर्शवली आहे. या उपस्थितीस दाद द्यावी लागेल , असे उद्गार सौ. परिचारक यांनी काढले. अमृताताई परिचारक यांनीही
पानकर आणि टमटम परिवाराचे कौतुक केले.

अनिलनगर येथील हळदीकुंकू समारंभात संगीत खुर्ची , लकी ड्रॉ इत्यादी खेळ सादर करण्यात आले . लकी ड्रॉ द्वारे एकही महिला बक्षीसा वाचून शिल्लक राहू नये याची जबाबदारी घेण्यात आली . सौ परिचारक यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले .याशिवाय लहान मुलांनाही कॅडबरीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आस्वाद घेतला. लाला पानकर आणि भाऊ टमटम परिवाराने कार्यक्रम आयोजित करून ,अनिल नगर परिसरात मोठी धमाल उडवून दिली.