23/12/2024

नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग

नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या शी भेट

नवसारी (गुजरात): –

नवसारी कृषी विद्यापीठ येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यामध्ये “ऍग्रो टेक्स्टाईल चा शेतीतील वापर” या कार्यक्रमासाठी मंगळवेढ्याचे शेतकरी कृषिभूषण अंकुश पडवळे व इतर शेतकऱ्यांना खास निमंत्रित करुन सहभागी करून घेण्यात आले होते. दुष्काळी भागात शेडनेट शेतीच्या माध्यमातून भाजीपाला पिकांचे घेण्यात येत असलेल्या उत्पादनात बाबतचे अनुभव शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्याची संधी कृषीभूषण अंकुश पडवळे यांना देण्यात आली होती.

सदर कृषी मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील व गुजरातचे कृषी व पशुसंवर्धन मंत्री ना. राघवजी पटेल यांच्या उपस्थितीत व नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ झेड. पी. पटेल, केंद्रीय वस्त्रोद्योग सहसचिव डॉ. राजीव सक्सेना, आय सी ए आर चे सहसंचालक डॉ. व्ही बी पटेल, सस्मेराचे अध्यक्ष मिहीर मेहता, नवसारी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. टी आर अलावत, सस्मिराचे संचालक डॉ. अशोक तिवारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी आर पाटील यांच्यासोबत मंगळवेढ्यातील शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा करून त्यांना शेडनेट हाऊस मधील भाजीपाला भेट दिला. तसेच मंगळवेढ्यातील दुष्काळी भागामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून पावसाचे पाणी पुनर्भरणाबाबतच्या योजना देण्याबाबत शिष्टमंडळाने मंत्री महोदय कडे विनंती केली. तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी गुजरातचे कृषी व पशुसंवर्धन मंत्री ना राघवजी पटेल यांच्याशीही मंगळवेढ्याच्या शेतकरी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. सदर शेतकरी शिष्टमंडळात कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासोबत शहाजहान पटेल, संतोष वाले, भगवान चौगुले, तानाजी माने मेजर आदी सहभागी झाले होते.

चौकट- केंद्रीय जलशक्ती मंत्री ना सी आर पाटील यांनी पंढरपूरचा दौरा व मंगळवेढ्यातील दुष्काळी भागाचा दौरा करण्याचे आश्वासन शेतकरी शिष्टमंडळाला दिल्याचे कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी सांगितले.

फोटो ओळी – नवसारी (गुजरात) – नवसारी कृषी विद्यापीठ येथील कृषी मेळाव्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना भाजीपाला भेट देताना मंगळवेढ्यातील शेतकरी शिष्टमंडळ