23/12/2024

छ. शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी

छ. शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची लेखी निवेदनाद्वारे मागणी

सांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून तालुक्यातील सबंध शिवप्रेमींची उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा शहरात लवकरात लवकर उभा रहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच याबाबतचे अन्य महत्त्वपूर्ण कामही पूर्ण झाले आहे. सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर बसावा ही शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि शिवप्रेमी जनतेची आग्रही मागणी आहे. याबाबत मंजुरीसाठी विहित नमुन्यात प्रस्तावही संबंधित प्रशासनाकडे दाखल केले आहेत.
सांगोला शहरात छ. शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही सबंध तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. याबाबत शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन एक सामाजिक चळवळ उभा केली आणि याद्वारे सदरचा पुतळा उभा करण्याच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या. शहरात छत्रपती शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा ही सबंध तालुक्यातील समाज बांधवांची आग्रहाची मागणी आहे. तालुक्यातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन लवकरात लवकर बैठक आयोजित करावी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या तात्काळ द्याव्या अशी मागणी शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.